Downloads provided by UsageCounts
हैद्राबाद स्वातंत्र्य लढ्यात भाई उद्धवराव पाटील यांचे योगदान प्रोफेसर डॉ. किशोरकुमार गोवर्धन गव्हाणे संशोधन मार्गदर्शक, शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम, ता. भूम जि. उस्मानाबाद ४१३५०४ महाराष्ट्र, भारत श्री. धनाजी दौलतराव भोसले संशोधक विद्यार्थी, वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाटोदा जि. बीड ४१४२०४ महाराष्ट्र, भारत Corresponding author E-mail: dhananjayb77@gmail.com Received: 12 September, 2023 | Accepted: 13 September, 2023 | Published: 14 September, 2023 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- महत्वाचे शब्द: हैद्राबाद मुक्ती संग्राम, लातूर अधिवेशन, सेंदरी रेल्वे स्टेशन हल्ला, काजळा, बार्शी व पानगाव कॅम्प प्रस्तावना १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या अन्यायी राजवटीतून भारत देश स्वतंत्र झाला. शेकडो वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या भारतीयांनी या दिवशी उगवलेल्या, ग्रहणमुक्त झालेल्या सूर्याचे दर्शन घेतले. मोठ्या आशा - अपेक्षेने भारतीय जनता मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत होती. भारतात खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जन्म झाला होता. मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नव्हते. हजारो लोकांच्या बलिदानाने, हजारो कुटुंबातील व्यक्तीने दिलेल्या प्राणाच्या आहुतीने स्वातंत्र्यसूर्य उगवत होता. या स्वातंत्र्याला जशी आनंदाची, समाधानाची, शौर्याची, पराक्रमाची, बलिदानाची किनार होती त्याचप्रमाणे या स्वातंत्र्याला कुठेतरी नैराश्याची, संतापाची आणि अनिश्चिततेचीही किनार होती. कारण अखंड व स्वतंत्र भारताची परिपूर्ती ही खऱ्या अर्थाने तत्कालीन भारतातील विविध लहान - मोठी संस्थाने विलीन केल्यानंतरच होणार होती. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू व गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत संयमाने व मुत्सद्दीपणे संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले. पण स्वातंत्र्यासोबतच माउंटबॅटन फाळणी योजनेने संस्थानांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आल्यामुळे जुनागड, हैद्राबाद व काश्मिर संस्थाकांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला. त्यापैकीच हैद्राबाद संस्थान हे भारतातील सर्वात बलशाली संस्थान होते. भौगोलिकदृष्टया हैद्राबाद संस्थान स्वतंत्र राहणे ही बाब भावी अखंड भारतासाठी त्रासदायक ठरणारी होती. एकूण २२४ वर्ष हैद्राबादच्या निजामाचे राज्य मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकावर होते. हैद्राबाद संस्थानात एकूण सात निजाम होऊन गेले. या प्रत्येक निजामाने हुकूमशाही प्रवृत्तीनेच राज्यकारभार केला. भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी या संस्थानच्या गादीवर सातवा निजाम मीर उस्मान अली खान हा बसलेला होता. तो प्रचंड महत्वाकांक्षी आणि सत्तापीपासू होता. निजामाने आपल्या अतिरेकी महत्वाकांक्षेमुळेच हैद्राबाद संस्थानाचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण होऊ दिले नाही. हैद्राबाद राज्याला वेगळ्या राष्ट्राचा (दक्षिण पाकिस्तान) दर्जा प्राप्त करून देण्याचा निजामाचा मानस होता. याच काळात हैद्राबाद संस्थान निझामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळी राजकिय आंदोलने, विद्यार्थी चळवळी इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलने ही झाली. हा विरोध मोडून काढण्यासाठी हैद्राबादच्या निजामाने ‘इत्तेहादुल मुसलमान’ या संघटनेला राजाश्रय दिला व कासीम रझवीच्या मदतीने रझाकार संघटनेचा वापर करुन संस्थांनातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली; दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला आणखी चालना मिळाली. निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या गावा- गावातून हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. स्वामी रामानंद तीर्थ व शेकडो स्वातंत्र्यसैनिकांच्या खडतर प्रयत्नातून १७ सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढा यशस्वी झाला. हा केवळ संस्थांनाच्या विलिनीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता. या मुक्तिसंग्राम लढ्यात स्वतंत्रता सेनानी भाई उद्धवराव पाटील यांचे सक्रिय योगदान होते. विषय विवेचन भाई उद्धवराव पाटील यांचा जन्म ३० जानेवारी १९२० रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील माणकेश्वर गावी (आजोळी) झाला. त्यांचे इयत्ता तिसरी पर्यंतचे शिक्षण मूळ गावी इर्ले येथे झाले. त्यांनी काटी येथे चौथीचे शिक्षण घेतले व पुढिल शिक्षणासाठी त्यांनी उस्मानाबादच्या मल्टिपर्पज हायस्कूल येथे प्रवेश घेतला. शालेय जीवनापासूनच भाई उद्धवराव पाटील यांच्याकडे नेतृत्वाचा गुण प्रभावी होता. मॅट्रिकला असताना आर्य समाजाचे नेते पंडित नरेंद्रजींना अटक झाली या निषेधार्थ भाईंनी सहकाऱ्यांना घेऊन एक दिवस शाळा बंद पाडली. त्यामुळे गावातील वातावरण तंग झाले इत्तेहादुल मुसलमीन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा आग्रह केला. परंतु मुख्याध्यापक बेग साहेब व सफीउल्ला गुरुजी उदारमतवादी असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून भाई उद्धवराव व त्यांच्या साथीदारांना सोडून दिले या घटनेचा पुढे उद्धवरावांच्या सार्वजनिक जीवनाच्या जडणघडणीत फार मोठा प्रभाव पडला. पुढे एल. एल. बी. चे शिक्षण पूर्ण करून काही काळ भाईंनी वकिली व्यवसाय देखिल केला. भाई उद्धवराव पाटील यांच्यावर त्यांचे छोटे चुलते ज्ञानेश्वर तात्या पाटील व त्यांच्या भगिनीचे यजमान अॅड. नरसिंहराव देशमुख (काटीकर) यांच्यामुळे लहान वयातच सत्यशोधकी आणि मार्क्सवादी विचारांचे संस्कार रुजले होते. त्यामुळे फार काळ वकिलीत न रमता त्यांनी सामाजिक कार्याची व राजकारणाची वाट धरली. सन १९३५ पासूनच खरे तर त्यांनी विद्यार्थी संघटनेमध्ये सहभागी होऊनच आपल्या कार्याला सुरुवात केली होती. १९४६ साली लातूरला महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन भरले होते त्याचे अध्यक्ष म्हणून फुलचंद गांधी यांची निवड करण्यात आली होती. परंतु फुलचंद गांधी सावकारी करत असल्याने त्यांच्या विरोधात भाई उद्धवराव व त्यांच्या सहकारी मित्रांनी ‘भक्षक हा रक्षक होऊ शकत नाही’ या शीर्षकाचे पत्रक काढून निषेध केला. त्यावेळी बाळासाहेब परांजपे यांनी मध्यस्थी करून फुलचंद गांधी यापुढे सावकारी करणार नाहीत करणार नाहीत असे जाहीर केले. सावकारशाही विरुद्ध गाजलेल्या अधिवेशनाच्या वेळी स्टेट काँग्रेसमध्ये अनेक विचारधारा असलेले कार्यकर्ते काम करत होते. गांधीवादी, समाजवादी, मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट हे सारे त्यात होते. नरसिंहराव - उद्धवराव मार्क्सवादाला मानणारे तेही स्टेट काँग्रेसचे कार्य करत होते. त्यांच्या गटाला सापत्न भावाची वागणूक दिली जात होती. तरी हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी विविध गट आपापसातील मतभेद विसरून स्टेट काँग्रेसचे कार्य करत होते. पुढे स्टेट काँग्रेसला निजामाने मान्यता दिली स्टेट काँग्रेसचे पहिले अधिवेशन हैदराबादला झाले. त्यात मराठवाड्यातील पाच एक हजार प्रतिनिधींचा सहभाग होता. नरसिंहराव-उद्धवरांचा गट ही त्यात आघाडीवर होता. सन १९४६-४७ मध्ये निजामाविरुद्ध तीन पातळ्यावरून रान पेटविण्याचे काम सुरू झाले. हे त्रिसूत्री काम तीन वेगळ्या गट व पक्षाने चालू केलं होतं ते तीन विभाग म्हणजे स्टेट काँग्रेसचा राजकीय लढा, आर्य समाजाची धार्मिक चळवळ आणि हिंदू महासभेचा भागानगर सत्याग्रह या तिहेरी हल्ल्याने निजामपुरता गोंधळून गेला त्याचा स्वभाव चिडचिडा बनला क्रूरपणा करण्यालाही त्याला काही वाटेना. आर्य समाज आणि हिंदू महासभा यांच्या धार्मिक चळवळीने हैदराबाद संस्थानात हिंदू मुसलमानात तणावाचे वातावरण पसरले. तेव्हा महात्मा गांधींनी स्टेट काँग्रेसला लढा थांबवण्याचा आदेश दिला. लढा थांबला तरी अर्धवट शिक्षित केलेली निमलष्करी रझाकारी सेना राज्यात सर्वत्र धुमाकूळ घालीत फिरू लागली. रझाकार यांच्याकडून सामान्य जनतेवर जुलूम जबरदस्ती होऊ लागली, स्त्रियांची अब्रू घेण्याचे प्रकार प्रसंग वाढू लागले. तेव्हा लष्करी प्रशिक्षण घेऊन आलेल्या उद्धवरावांनी, नरसिंहरावांच्या सहकार्याने पुणे, बडोदा आणि गोवा इथून हत्यारे मिळविली आणि सोलापूर जिल्ह्यातील सरहद्दीवर तरुणांना, शेतकऱ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठीच्या हालचालींना सुरुवात केली; कॅम्प सुरू केले. रझाकारांचे अत्याचार वाढू लागले त्यामुळे उस्मानाबाद व परिसरातल्या खेडेपाड्यातील लोक घरदार, मालमत्ता सोडून सीमेवरील इंग्रजी राज्यातील गावागावातून आपापल्या नातेवाईकांकडे आश्रयासाठी जाऊ लागले. परिस्थितीचे गांभीर्य आणि जनतेच्या रक्षणाची जबाबदारी लक्षात घेऊन उद्धवरावांनी प्रथम आपल्या पत्नीस शारदाबाई यांना इर्ले या आपल्या मूळ गावी नेऊन ठेवले व स्वतः रझाकारांशी लढण्यास तयार झाले. पानगाव, काजळा आणि बार्शी येथे आपल्या सहकार्याना घेऊन लष्करी प्रशिक्षणाचे काम केले. त्यांना अण्णासाहेब गव्हाणे, अॅड. नरसिंहराव देशमुख, विश्वासराव पाटील, ज्ञानोबा तात्या पाटील यांचे मार्गदर्शन व सहाय्य होतेच पण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रति सरकारने ही आपली प्रशिक्षित माणसे आणि हत्यारे पानगाव, काजळा आणि बार्शीच्या लष्करी कॅम्पमध्ये सहकार्यार्थ पाठविली. त्यामध्ये जी.डी. अर्थात बापूसाहेब लाड यांचा प्रमुख सहभाग होता. एकदा सेंदरी ता. परांडा रेल्वे स्टेशनवर भाई जी. डी. लाड व भाई उद्धवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली १० ते १५ सहकार्यांना सोबत घेऊन ४० ते ५० काडतूस व दोन स्टेनगन सह निजामाच्या ५०० च्या आस पास असलेल्या शस्त्र सज्ज सैनिकांवर भर दिवस हल्ला केला व त्यांना पळवून लावले. ही पार्टी पिंपरी भोईज येथील पंडितराव पाटील यांच्या वाड्यात आश्रयाला गेली तेव्हा भाई जी. डी. लाड व भाई उद्धवराव पाटलांनी बरोबर २० सैनिक घेतले व रात्री दोन वाजता वाड्यावर हल्ला केला. त्यानंतर सहकाऱ्यांचा दररोज रात्री वाड्यावर हल्ला करण्याचा परिपाठ राहिला. त्यामुळे पोलीस पार्टी वैतागून गेली व शेवटी सोलापूरच्या कलेक्टर साहेबांनी ही पोलीस पार्टी परांडा तालुक्याच्या ठिकाणी नेली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच दिवशी भाई उद्धवराव पाटील यांनी इर्ले ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला त्यामुळे पोलीस अॅक्शन पूर्वी निजामी अंमलापासून मुक्त होणारे इर्ले हे मराठवाड्यातील पहिले गाव होते. रझाकारांशी झुंज देताना उद्धवरावांचे योगदान लक्षणीय होते. रझाकार व पोलीस ठाण्यावर हल्ले करणे, सारा लुटून आणणे, शत्रूवर बॉम्ब टाकणे, लोकांना एकत्र करणे, गोळीबार करणे, रझाकारांना पळवून लावणे इत्यादी धाडसी आणि धोक्याची कामे करण्यात उद्धवराव नेहमी आघाडीवर असत. रझाकारांच्या रणधुमाळीचा भाई उद्धवराव आणि अॅड. नरसिंहराव देशमुख यांच्या घराला धक्का बसला. रझाकारांनी अॅड. नरसिंहराव देशमुख यांचे काटी येथील घर ताब्यात घेतले आणि ते अरबांना राहायला दिले. त्यांच्या घरातील सामान ही लुटून नेले त्या घरात उद्धवराव दादांचेही सामान लुटले गेले घर सामान गेल्याचे त्यांना दुःख नव्हते पण काटी येथे रझाकारांनी हल्ला केला त्यात नरसिंहरावाचे चुलत भाऊ आणि उद्धवरावांचे साडू गणपतराव देशमुख यांना रझाकारांनी गोळ्या घालून ठार केले होते. उद्धवरावांची एवढी व्यक्तिगत आणि कौटुंबिक हानी झाली तरी त्यांचा बदला घेण्यासाठी सामान्य मुसलमानांना छळण्याचा, मारण्याचा दुष्ट विचार त्यांनी मनातही आणला नाही. त्यांचे शत्रुत्व रझाकाराशी आणि मुख्यतः निजामाशी होतं सर्वसामान्य गरीब मुसलमान लोकांशी नव्हतं त्यांची ही आदर्श वैचारिक वृत्ती विसरता न येण्यासारखी आहे. पोलीस अॅक्शन पूर्वी निजामी राजवटीविरुद्ध झगडणारे उद्धवराव प्रसंगी कठीण वज्रासारखे झाले होते. पण पोलीस ऍक्शन नंतर गोरगरीब मुसलमानावर होणारे अन्याय, त्यांना लुटण्याचा, छळण्याचा प्रकार सुरू झाला त्यावेळी उद्धवराव पाटील, नरसिंहराव देशमुख व अण्णासाहेब गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांना संरक्षण देण्याची मोहीम हाती घेतली. गावोगाव सभा घेऊन निजामाविरुद्धचा लढा मुस्लिमांविरुद्ध नाही हे पटवून दिले. उद्धवरावांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात सशस्त्र लढा दिला ही बाब जितकी महत्त्वाची आहे त्यापेक्षाही त्यांनी या लढ्यातून सामाजिक एकतेचा, बंधुभावाचा विचार ग्रामीण भागात रुजविण्याचा मुलगामी प्रयत्न केला ही गोष्ट फार मोलाची आहे. सारांश हैदराबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. निजामाच्या अन्यायी व अत्याचारी राजवटी पासून मुक्त होण्यासाठी येथील जनतेने जो लढा दिला तो अभूतपूर्व आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाइतकेच याही संग्रामाचे महत्त्व आहे आणि स्वरूप ही व्यापक आहे. हैद्राबाद मुक्तिसंग्रामात उस्मानाबाद जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यामध्ये भाई उद्धवराव पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यामध्येच नव्हेतर राजकारण, समाजकारण, शिक्षण, अर्थव्यवस्था व शेतकरी, दिन - दुबळे यांचे प्रश्न यासर्व क्षेत्रात भाई उद्धवरावांनी अग्रेसर राहून कार्य केले आहे. भाई उद्धवराव पाटील यांच्या कार्याची प्रेरणा ही जिल्ह्यातील तरुणांना स्फूर्ती देणारी आहे. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यास संपूर्ण हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या लढ्यामध्ये भाई उद्धवरांचे कार्य उल्लेखनीय आहे. पराक्रम, जिद्द, स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची समर्पण वृत्ती, ध्येयदृष्टी या गुणामुळे त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात मोलाची भूमिका बजावली. संदर्भग्रंथ सूची व. न. इंगळे, महाराष्ट्राचे शिल्पकार भाई उद्धवराव पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती - २००३, पान नं. ६, ७, ९ वसंत ब. पोतदार, हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम, विद्याभारती प्रकाशन लातूर, तृतीय आवृत्ती - २००६, पान नं. २३१ दैनिक एकमत, हैद्राबाद मुक्तिसंग्राम व भाई उद्धवरावजी पाटील, प्रा. रवि सुरवसे यांचा लेख, दिनांक - १७ सप्टेंबर २०१२, पान नं. १० K. K. Choudhri, Maharashtra and Indian Freedom Struggle, Maharashtra State Silver Jubilee Publication, Mumbai, 1985, Page No. 113, 115 B. S. Dhengle, Hyderabad Freedom Struggle, Kalpana Prakashan, Nanded, 1998 Page No. 20 https://inmarathi.com/169426/bhai-uddhavrao-patil-life-story-and-political-career/
हैद्राबाद मुक्ती संग्राम, लातूर अधिवेशन, सेंदरी रेल्वे स्टेशन हल्ला, काजळा, बार्शी व पानगाव कॅम्प
हैद्राबाद मुक्ती संग्राम, लातूर अधिवेशन, सेंदरी रेल्वे स्टेशन हल्ला, काजळा, बार्शी व पानगाव कॅम्प
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
| views | 29 | |
| downloads | 19 |

Views provided by UsageCounts
Downloads provided by UsageCounts