
भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence - EQ) म्हणजे केवळ स्वतःच्या भावना समजून घेणे नव्हे, तर इतरांच्या भावना ओळखून त्यांचा योग्य वापर करून आपले जीवन आणि नातेसंबंध अधिक समृद्ध करण्याची कला होय. स्वतःची जाणीव, स्वतःवर नियंत्रण, प्रेरणा, सामाजिक कौशल्ये,सहानुभूती हे भावनिक बुद्धिमत्तेचे मुख्य घटक मानले जातात. उत्तम नातेसंबंध, मानसिक आरोग्य, कामाच्या ठिकाणी यश, निर्णयक्षमता या बाबतीत भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे. याच भावनिक बुद्धिमत्तेच्या जोरावर राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कसे घडविले याचा आढावा आपण या शोध निबंधातून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न केवळ शस्त्रांच्या जोरावर पूर्ण झाले नाही, तर त्यामागे एक भक्कम वैचारिक आणि भावनिक पाया होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होताना त्यांचे आई-वडील, राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांनी त्यांच्यात ज्या अनोख्या अशा गुणांचे बीजारोपण केले. ते आधुनिक मानसशास्त्राच्या 'भावनिक बुद्धिमत्ता' (Emotional Intelligence) या संकल्पनेत अतिशय उत्कृष्टपणे बसतात. सामाजिक जाणीव आत्मभान, आत्मनियमन आणि नातेसंबंध व्यवस्थापन या घटकांचा वापर करून शिवरायांचे चरित्र राजमाता जिजाऊ साहेब आणि शहाजीराजे भोसले यांनी घडवले.
