
म. कर्वे हे काळाच्या आधी जन्मलेले महाराष्ट्रातील एक थोर समाज सुधारक. अत्यंत हुशार असणा-या म. कर्वेंना शिक्षण घेत असतानाच हिंदू धर्म-समाजातील अनेक वैगुण्ये लक्षात येऊ लागली होती. लहान वयात होणारी लग्न, लहान वयातच मुलींना येणारे वैधव्य पाहून म. कर्वे व्यथित होत असत. मात्र जेव्हा स्वत:च्या घरात बहिणीच्या वैधव्यामुळे म. कर्वे यांच्या मनामध्ये या प्रश्नाने एक मोठी जागा व्यापली. पुढे मित्राच्या बहिणीला वैधव्य प्राप्त झाल्या नंतर म. कर्वे यांनी आयुष्यात विधवा स्त्रियांच्या उध्दारासाठी काहीतरी कराचचे असा मनाशी निश्चय केला. याच दरम्यान बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय ते इश्वरचंद्र विद्यासागर आणि इतर बंगाली समाज सुधारकांचे विधवा आणि स्त्री शिक्षण विषयक सुरु असलेले कार्य म. कर्वे यांची या विषया संदर्भात मनोभूमिका पक्की करणारे ठरले. म. कर्वे यांनी समाजाला वेळ प्रसंगी प्रखर विरोध करुन विधवा स्त्रियांची अवस्था सुधारायची असा पण केला होता. अशातच म. कर्वे यांच्या पत्नी राधाबाईंचे निधन झाले. नातेवाईकांनी दुसरे लग्न करण्याचा तगादाच लावला आणि कर्वे यांनी विधवेशी विवाह करण्याचा आपला विचार प्रत्यक्षात आणला. या महाराष्ट्रातील पहिल्या विधवा विवाहानी महाराष्ट्र ढवळून निघाला. कर्वे यांना समाजानी बहिष्कृत केले, मात्र कर्वे मागे हटले नाहीत. त्यांनी बहिष्कार सहन केला मात्र आपल्या भूमिकेशी ते ठाम राहिले. पुढे समाजाला म. कर्वे यांच्या कार्याचे महत्व लक्षात येऊ लागले. म. कर्वे पुढे जिवंतपणीच एक दंतकथा बनले. भारत रत्न झाले. त्यांच्या कार्यानी हजारो विधवांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले. मी माझ्या शोध निबंधात म. कर्वे यांचा पूर्ण जीवनपट न घेता केवळ म. कर्वे यांनी केलेले विधवा उध्दार विषयक कार्याचीच थोडक्यात मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
विधवा, समाज सुधारक, धर्म.
विधवा, समाज सुधारक, धर्म.